छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदाच्या गळीत हंगामात सहभागी ६१ कारखान्यांपैकी ५७ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. अवघे चार कारखाने आता सुरू आहेत. हंगामात सहभागी होणाऱ्या ६१ कारखान्यांमध्ये धाराशिवमधील १४, छत्रपती संभाजीनगर व नांदेडमधील प्रत्येकी सहा, हिंगोली व जालन्यातील प्रत्येकी पाच बीड व परभणीतील प्रत्येकी सात, तर लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश होता. जालन्यातील तीन व हिंगोलीतील एका कारखान्याचा ऊस गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. घनसांगवी, अंबड तालुक्यात शिल्लक राहणारा ऊस लक्षात घेता हे कारखाने सुरू राहतील. साधारणतः २० एप्रिलपर्यंत ऊसाचे गाळप पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यातील सर्व कारखान्यांनी ११ एप्रिलपर्यंत २ कोटी ५५ लाख ३२ हजार ९९३ टन उसाचे गाळप करत २ कोटी ४५ लाख १९ हजार २२ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे साखर उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सर्वांत जास्त, तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांनी सर्वांत कमी राहिला आहे. साखर विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत ५७ कारखान्यांनी गाळप आटोपल्याची माहिती त्यांना कळविले आहे. त्यामध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, नांदेड व लातूर या जिल्ह्यांतील कारखान्यांचा समावेश आहे.