बिड : महाराष्ट्रात साखर हंगामाने गती घेतली आहे. ऊस गाळपात पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील साखर कारखानेही अग्रेसर आहेत. मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यांपासून १४ साखर कारखाने गाळप करीत आहेत.
आतापर्यंत माजलगाव तालुक्यातील जयमहेश साखर कारखान्याने ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून आघाडी घेतली आहे. कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅच्युरल्स साखर कारखान्याने ४.५ लाख टन उसाचे गाळप करून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तेलगाव येथील लोकनेता सुंदरराव सोळंकी कारखान्याने ३ लाख ९३ हजार टन उसाचे गाळप करीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान टिकवले आहे.
साखर उताऱ्यात वसमत येथील पूर्णा साखर कारखाना १०.५५ टक्के सरासरीसह पहिल्या क्रमांकावर आहे. नांदेडच्या बळीराजा आणि बागेश्वरी येथील श्रद्धा कारखान्याची रिकव्हरी अनुक्रमे १०.३२ आणि १०.१२ टक्के आहे. गेल्या दोन वर्षांपासून चांगला पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीकडे वळले आहेत.
माजलगाव तालुक्यातील एका खासगी आणि दोन सहकारी कारखान्यांकडून गेल्या तीन महिन्यांपासून उसाचे गाळप सुरू आहे. जयप्रकाश कारखाना दररोज सरासरी ४५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करीत आहे.