हुतात्मा कारखाना निवडणुकीत हुतात्मा पॅनेलचा सर्व जागांवर विजय

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील हुतात्मा पॅनेलने जय हनुमान पॅनेलवर दणदणीत विजय मिळवला. हुतात्मा पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. या पॅनलचे आधी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत चुरशीने ८२ टक्के मतदान झाले होते. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी केली.

हुतात्मा पॅनेलचे अरविंद कदम (मसुचीवाडी), बापूसाहेब पाटील (जुनेखेड), रामचंद्र पाटील (पुणदी), शिवाजी खामकर (अहिरवाडी), विशाखा कदम (वाळवा), रामचंद्र भाडळकर (नागठाणे), गंगाराम सूर्यवंशी (सूर्यगाव), शरद माळी व लक्ष्मण शिंदे (नागठाणे) हे बिनविरोध निवडून आले होते. आताच्या निवडणुकीत उर्वरीत सर्व जागांवर हुतात्मा पॅनलने बाजी मारली. निवडणूक निकालानंतर वैभव नायकवडी म्हणाले की, हुतात्मा कारखाना शेतकऱ्यांच्या भाकरीशी निगडीत आहे. निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. तर गौरव नायकवडी म्हणाले की, क्रांतीवीर नागनाथ अण्णांनी शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी जी स्वप्ने पाहिली, ती स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी वीरधवल नायकवडी, उमेश घोरपडे, बाळासाहेब नायकवडी, नंदकुमार शेळके यांची भाषणे झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here