नवी दिल्ली : मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये वॅगन आर फ्लेक्स-फ्युएल प्रोटोटाइपचे सादरीकरण केले होते. त्यापूर्वी फ्लेक्स फ्युएल तंत्राने युक्त वॅगन आरचा समावेश दिल्लीतील SIAM इथेनॉल औद्योगिक प्रदर्शनातही करण्यात आला आहे. आता प्रसार माध्यमातील वृत्तानुसार कंपनी २०२५ मध्ये आपले पहिले फ्लेक्स – फ्युएल मास सेगमेंट वाहन लाँच करण्याची योजना तयार करीत आहे.
मारुतीच्यावतीने फ्लेक्स इंधनयुक्त वाहनांना भारतात स्थानिक स्तरावर विकसित केले जाईल. यातून देशात कच्च्या तेलाची आयात कमी करण्यास मदत मिळेल आणि देशात कृषी आधारित अर्थव्यवस्थेलाही प्रोत्साहन मिळेल. ही फ्लेक्स फ्युएल कार्स २० टक्के (E२०) आणि ८५ टक्के (E८५) यादरम्यान कोणत्याही इथेनॉल पेट्रोल मिश्रणावर चालविण्यास सक्षम असतील.
याशिवाय कार उत्पादकांनी आर्थिक वर्ष २०२५ मध्ये येणाऱ्या आपल्या ईव्हीकडे लक्ष वेधताना एक प्रॉडक्शन प्लॅन तयार केला आहे. एवढेच नव्हे तर २०३० पर्यंत मारुती सुझुकीचे उद्दिष्ट १५ टक्के बॅटरी इलेक्ट्रिक वाहने, २५ टक्के हायब्रिड आणि ६० टक्के आयसीई कारचे विक्री करण्याचे आहे. यामध्ये सीएनजी, बायोगॅस आणि इथेनॉल-संचालित पॉवरट्रेनचा समावेश आहे.