कोल्हापूर : कागल येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शुक्रवार (दि. १८) ते सोमवार (दि. २१ ऑगस्ट) दरम्यान मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही स्पर्धा ऑलिंम्पिकच्या धर्तीवर सलग ३७ व्या वर्षी होत असल्याची माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली.
घाटगे म्हणाले, या कुस्ती स्पर्धा ३१ विविध गटांमध्ये होतील. त्यामध्ये चौदा वर्षांखालील बाल व सोळा वर्षांखालील कुमार गटामध्ये प्रत्येकी ८ गट तसेच १९ वर्षांखालील ज्युनिअर गटामध्ये सात व सिनियर गटामध्ये पाच वजनी गटांमध्ये या स्पर्धा होतील. महिला कुस्तीगिरांसाठी ४५, ५५ व ६५ किलो अशा तीन वजनी गटांमध्ये स्पर्धा होणार आहेत. त्या कारखाना कार्यक्षेत्र, कागल तालुका, गडहिंग्लज शहर, उत्तर व कडगाव कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ मर्यादित मॅटवरील कुस्ती स्पर्धा होणार आहेत. विविध वजनी गटांतील विजेत्या मल्लांना कारखान्यामार्फत शिष्यवृत्तीचे वाटप केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांनी कारखाना कार्यक्षेत्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग सुरू केला असून, समरजितसिंह घाटगे यांनी आजही तो कार्यक्षमपणे सुरू ठेवला आहे. या विभागामार्फत उदयोन्मुख कुस्तीगीर व इतर खेळातील खेळाडूंना कारखाना व पिराजीराव पाटगे ट्रस्ट यांच्यामार्फत दत्तक घेऊन कारखान्यामार्फत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करून घेतली जात आहे.