लखनौ : गेल्या सहा वर्षांतील साखर उद्योगाने मांडलेल्या नवकल्पनांचे कौतुक करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांच्या आधुनिकीकरणामुळे ते ‘एकात्मिक साखर संकुल’ बनले आहेत.
साखर उद्योगाला १२० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक क्षणानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना योगी म्हणाले की, आज, एकाच ठिकाणी साखर उत्पादित होत आहे, सहवीज निर्मिती प्लांटही उभारला आहे आणि ऑक्सिजन तसेच इथेनॉल प्लांटही आहेत. देशात सर्वाधिक ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन करणारे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील साखर कारखाने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे स्वीकारत सर्वात जादा इथेनॉल उत्पादन करीत आहेत.
ते म्हणाले की, १२० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्यात देवरिया येथे देशातील पहिला साखर कारखाना स्थापन करण्यात आला. गेल्या काही दशकात ज्या पद्धतीने साखर कारखाने बंद होत होते, त्यामुळे शेतकरी निराश झाले होते. २०१७ पर्यंत ते पळून जात होते. आदित्यनाथ म्हणाले की, गेल्या सहा वर्षात डीबीटी (प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण) च्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १ लाख ९७ हजार कोटी रुपयांची बिले देण्यात आली आहेत.