भोपाळ (मध्य प्रदेश) : भारतातील सहकार क्षेत्राने सुरुवातीच्या काळात उत्तम कामगिरी केली होती. मात्र त्यानंतर या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले. हे क्षेत्र महत्त्वाचे असूनही या क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय नव्हते. आता नव्या सरकारने या क्षेत्रासाठी मंत्रालय सुरू केले आहे. या क्षेत्राच्या विकास आणि विस्तारासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असे सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले.
मध्यप्रदेश सरकारने सहकार या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परिषदेत बोलताना शहा यांनी सांगितले की, सहकार क्षेत्राच्या उन्नतीकडे लक्ष दिले असते तर भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात सहकार क्षेत्राचे योगदान निश्चितपणे वाढलेले असते. या संबंधातील कायद्यामध्ये आम्ही आवश्यक त्या दुरुस्त्या करीत आहोत. तसेच अनावश्यक कायदे रद्द करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे विविध राज्यात सहकार क्षेत्राचे जाळे वाढेल. या क्षेत्राच्या अखत्यारीत नवी क्षेत्र येतील, असे शहा यांनी सांगितले.
शहा म्हणाले कि, सहकार क्षेत्रासाठी राष्ट्रीय पातळीवर एक सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता होती. मात्र असे धोरण नव्हते. त्यामुळे केवळ काही राज्यांमध्ये सहकार क्षेत्र वाढले आहे. इतर राज्यांमध्ये या क्षेत्राचा विस्तार झाला नाही. आता संपूर्ण देशातील सर्व राज्यात सहकार क्षेत्र वाढेल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र सरकार करीत आहे. राज्य सरकार या पुढाकाराला प्रतिसाद देत आहेत, असे शहा यांनी यावेळी सांगितले.