पुणे : भाजप सरकार साखर उद्योगाच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहे. सरकारची साखर उद्योगाला पाठबळ देण्याची नेहमीच भूमिका राहिली आहे. देशातील साखर उद्योगांच्या प्रश्नांवर केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात लवकरच बैठक घेतली जाईल, अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच, इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठविण्याबाबतही लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
साखर संकुल येथे बुधवारी (दि. १०) मंत्री मोहोळ यांनी सदिच्छा भेट दिली. त्या वेळी साखर आयुक्त डॉ. कृणाल खेमनार आणि कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर साखर उद्योगाचे प्रश्न, महाराष्ट्रातील साखर उद्योगाची स्थिती, यावर झालेल्या सविस्तर चर्चेवेळी त्यांनी संयुक्त बैठक घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केल्याची माहिती बैठकीनंतर आयुक्त डॉ. खेमनार यांनी दिली. या
ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांनी उसाची रास्त आणि किफायतशीर किमतीची (एफआरपी) दिलेली रकमेची सद्यस्थिती सांगितली. राज्यातील कारखाने इथेनॉलनिर्मितीस तयार असून, ऑईल कंपन्यांनी कारखान्यांना दिलेल्या कोट्यानुसार इथेनॉल पुरवठा करण्यासही तयार आहेत. मात्र, केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठविण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे. त्यावर साखर उद्योगाचे शिष्टमंडळ मला भेटले असून, त्यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केल्याचे खेमनार यांनी सांगितले.
ऊसतोडणी यंत्र अनुदानाचे प्राथमिक स्वरूपात पाच जणांना वाटप झाले आहे. उर्वरित ९० ऊस तोडणी यंत्रांसाठीचे अनुदान मिळण्याची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. केंद्र सरकारच्या सहकार्यामुळेच ही योजना राज्यांत सुरू असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आल्याचे खेमनार यांनी सांगितले.