सांगली : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ऊस दराचा तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आज, शनिवारी (16 डिसेंबर) साखर कारखानदारांची बैठक बोलावली आहे. गेल्या दीड महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दरासाठी विविध प्रकारे आंदोलने करण्यात येत आहेत. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. बैठकीला सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांना निमंत्रित केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला दोन कारखाने वगळता कोणीही प्रतिसाद दिला नाही. गेल्यावर्षी ३,००० रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये आणि ३,००० रुपये दिलेल्यांनी ५० रुपये दर द्यावा अशी मागणी स्वाभिमानीची आहे. तसेच यंदा एफआरपी अधिक १०० रुपये द्यावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुसंख्य कारखान्यांनी स्वाभिमानीची ही मागणी मान्य केली. सांगली जिल्ह्यातील दत्त इंडिया – वसंतदादा, दालमिया कारखान्याने संघटनेच्या मागणीला प्रतिसाद दिला आहे. मात्र इतर कारखान्यांनी दुर्लक्ष केले आहे.