सोनहिरा कारखान्याचे सभासद शेतकरी ‘व्हीएसआय’च्या प्रशिक्षण दौऱ्यावर : माजी आमदार मोहनराव कदम

सांगली : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत कारखाना कार्यक्षेत्रातील ३० ऊस उत्पादक शेतकरी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील ऊस शेती ज्ञानयाग या चार दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी रवाना झाले. हे प्रशिक्षण वर्ग चार दिवस चालणार असून सदर शेतकऱ्यांना प्रशिक्षणानंतर स्वतःच्या व आपल्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये याचा चांगला फायदा होणार आहे. कारखान्याच्या खर्चाने शेतकऱ्यांना पाठविले जाते. प्रशिक्षण कालावधीमध्ये माती पाणी परीक्षण महत्व, खत व पाणी व्यवस्थापन, ऊती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर, स्वयंचलित ठिबक सिंचन आदी विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी माजी आमदार मोहनराव कदम म्हणाले, कारखान्याच्या ऊस विकास विभागामार्फत कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकऱ्यांना वर्षातून दोन वेळा या प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. आज अखेर ६०० पुरुष व १७८ महिला असे एकूण ७७८ शेतकऱ्यांना कारखान्याने स्वखर्चाने प्रशिक्षणास पाठवले आहे. सध्या नवतरुण शेतकरी वर्गदेखील शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे. त्यांना संधी देण्याचा प्रयत्न आहे. यावेळी संचालक रघुनाथराव कदम, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजी शिंदे, जगन्नाथ माळी, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम, शेती अधिकारी प्रशांत कणसे, उपशेती अधिकारी वैभव जाधव, जनसंपर्क अधिकारी सयाजी जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here