वसमत : आर्थिक संकटात असलेला टोकाई सहकारी साखर कारखाना टिकावा, यासाठी ‘पूर्णा’ चे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी टोकाई भाडेतत्त्वावर घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ‘पूर्णा’ने कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी तयारी दर्शविली असून, त्यासाठी अधिमंडळाची विशेष सभा बोलवाली अशी मागणी सभासदांनी साखर आयुक्तांकडे केली आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर दोन हजारांवर सभासदांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
टोकाई सहकारी साखर कारखाना १२५० क्षमतेचा आहे. कारखाना चुकीच्या नियोजनामुळे डबघाईस आला. गाळपाची परवानगी नसताना कारखान्याने गाळप केले. २०२३- २४ हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले थकली आहेत. १३ कोटींची ‘एफआरपी’ ही थकली आहे. काही बँकांचे कर्ज थकले आहे. कारखान्यात साखर, मोलॅसिस काहीच शिल्लक नाही. थकीत देणे देण्यासाठी कारखाना मशिनरी विक्रीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. हे थांबवून कारखाना वाचवावा असे प्रयत्न सुरू झाले आहेत. ‘पूर्णा’ ने ‘टोकाई’ भाडेतत्त्वावर घेऊन चालविला तर कारखाना टिकेल, असे सभासदांचे मत आहे. जागरूक सभासदांनी ‘टोकाई’ वाचायला हवा, हा उद्देश समोर ठेवून साखर आयुक्तांना निवेदन पाठविले आहे.