पुणे : माळेगाव साखर कारखान्याच्यावतीने हंगामात गाळपासन आलेल्या उसाला प्रती टन २०० रुपये कांडे पेमेंट बुधवारपासून दिले जाणार आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यावर ही रक्कम एकरकमी जमा होईल. यासाठी जवळपास १९ ते २० कोटी रुपये रुपयांची तरतूद केल्याचे जगताप यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी सांगितले. उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते.
अध्यक्ष जगताप म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊस लागवडीसाठी शेतीची मशागत, उसाचे बेणे, लागण, खते आदींसाठी पैसे लागणार आहेत. १५ जूनपासून शाळा, महाविद्यालय सुरू होणार आहेत. यासाठीदेखील शेतकऱ्यांना पैशांची गरज भासेल. सध्या साखरेची विक्री तसेच इतर काही अडचणी कारखानदारांसमोर आहेत. तरीही उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचनेनुसार सभासदांच्या बँक खात्यावर तातडीने पैसे जमा करण्यात येतील. कारखान्याने उसाला प्रती टन ३००० रुपये दिले आहेत. कांडे पेमेंटच्या माध्यमातून जादा २०० रुपये सभासदांना मिळणार आहेत. यापुढे देखील अधिकचा ऊसदर देण्याचा प्रयत्न असेल असे जगताप म्हणाले.