लातूर : सिद्धी शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विविध ऊस विकास योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन व अहमदपूर-चाकूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते म्हणाले, चालू वर्षात सिद्धी शुगर कारखाना परिसर व कार्यक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे ऊस लागवड करण्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे, याचा फायदा सिद्धी शुगर कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासदांना घेता यावा म्हणून कारखान्याने विविध ऊस विकास योजना राबवण्याचे धोरण ठरविले आहे.
आमदार पाटील म्हणाले, पूर्व हंगामी ऊस लागवड योजनेत जे सभासद माहे सप्टेंबर २०२४ ते माहे ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ऊस लागवड करतील त्यांना ऊस क्षेत्राच्या प्रमाणात अर्धा एकर ऊस लागवडीसाठी १ पोते युरिया खत अनुदान देण्याचा व त्यापुढील ऊस लागवड क्षेत्र जास्तीत जास्त ५ एकर (प्रती एकरी २ पोते प्रमाणे जास्तीत जास्त ५ एकर पर्यंत १० पोते) पर्यंत ऊस लागवड करणाऱ्या सभासदांना ऊस लागवड क्षेत्राच्या प्रमाणात १० पोते युरिया खत अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, जे ऊस उत्पादक सभासद पुढील हंगाम लागवडीसाठी ऊस बेणे मळा २०२४-२५ योजनेत लागवड करतील, त्यासाठी लागणाऱ्या ऊस बेणेचा खर्च ऊस उत्पादक सभासदांनी करावयाचा आहे, ऊस बेणे मळा योजनेसाठी लागणारे पायाभूत, प्रमाणित ऊस बेणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव येथून सभासदांना त्यांच्या शेता पर्यंत पोहोच करणे साठी येणारा वहातुक खर्च अनुदान स्वरूपात कारखाना करणार आहे. ऊस विकास लागवड योजना सभासदांसाठी असून केंद्र शासनाची प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना व राज्य शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संयुक्तपणे सोलार पंप पुरवीत असलेल्या योजनेचे ऑनलाईन करण्याचे मार्गदर्शन सिद्धी शुगर कारखान्याचे सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांना कारखान्याच्या शेतकी खात्यातील संबंधित कर्मचाऱ्यां मार्फत करण्यात येणार आहे.