नवी दिल्ली : मायक्रोप्लास्टिक्समुळे वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेवर वाईट परिणाम होत आहे. याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर होत आहे. त्यामुळे गहू, भात आणि मका यासारख्या प्रमुख पिकांचे उत्पादन दरवर्षी १४ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे वनस्पती कार्बन डायऑक्साइड आणि पाण्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात आणि त्यांचे अन्न बनवतात. या प्रक्रियेत, वनस्पती कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात, तर ऑक्सिजनदेखील तयार होतो, जो वनस्पती वातावरणात सोडतात. या काळात, वनस्पती त्यांच्या मुळांद्वारे मातीतील पाणी देखील शोषून घेतात. ही प्रक्रिया पृथ्वीवरील कार्बन डायऑक्साइडची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते.
‘अमर उजाला’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, चीनच्या नानजिंग विद्यापीठ, चायनीज अकादमी ऑफ सायन्सेस, मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ तसेच अमेरिका आणि जर्मनीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, मायक्रोप्लास्टिक्स केवळ मातीच्या संरचनेवर परिणाम करत नाहीत तर वनस्पतींद्वारे पोषक तत्वे आणि पाणी शोषण्याच्या प्रक्रियेतही अडथळा आणत आहेत. हे सूक्ष्म कण केवळ पृथ्वीवरच नव्हे तर महासागर आणि गोड्या पाण्याच्या परिसंस्थांमध्येही प्रकाशसंश्लेषणात व्यत्यय आणत आहेत. याचा अर्थ असा की समुद्र आणि गोड्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींवरही याचा परिणाम होत आहे. जर असेच चालू राहिलेतर जागतिक स्तरावर दरवर्षी ३६१ दशलक्ष मेट्रिक टन धान्याचे नुकसान होईल.