बागलाण : ऊसतोडणी मजुरांच्या स्थलांतरामुळे बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील तळवाडे दिगर, भवाडे, मळगावसह परिसरातील आदिवासी वाड्या-वस्त्या ओस पडू लागल्या आहेत. निवडणुकीचे मतदान संपताच तळवाडे दिगरसह परिसरातील गावांतील मजूर ऊस तोडणीसाठी जाण्यास सज्ज झाले आहेत. यंदा विधानसभा निवडणुकीच्या मतदानामुळे अनेक वर्षांमध्ये पहिल्यांदाच दिवाळी सण घरी साजरा करण्याचा योग त्यांना मिळाला. आता मतदान करून गावागावातील तांडे ऊस तोडणीसाठी रवाना होत आहेत. अन्नधान्य, सरपण आणि कपड्यांचे गाठोडे असा संसार घेऊन हे ऊसतोड मजुरांचे तांडे रवाना होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नाशिक जिल्ह्यासह पुणे, सोलापूर, पंढरपूर, अहिल्यानगर, धाराशीवसह वेगवेळ्या जिल्ह्यांत ऊस तोडणी मजूर स्थलांतर करीत आहेत. आगामी ४-५ महिने आपल्या घरापासून लांब, कोणत्यातरी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील उसाच्या फडात आता हे मजूर आपला मुक्काम करतील. दरम्यान, ऊस तोडणी मजुरांच्या स्थलांतरामुळे वाड्या, वस्त्या ओस पडू लागल्या आहेत. मजुरांचे स्थलांतर होत असल्याने या कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधःकारमय होत आहे. परिसरातील बाजारपेठही थंडावली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात स्थलांतरामुळे परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मजूर टंचाईचा सामना करावा लागत आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.