राहुरी (अहमदनगर): तालुक्यातील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकर्यांना संजीवनी देण्याचे काम करणारा आहे. कारखान्याचे अर्थकारण भक्कम पायावर उभे राहणे गरजेचे आहे. पण कारखान्यात पक्षभेद, गट तटाचे राजकारण होवू नये. हे सारे राजकारण बाजूला ठेवून खासदार डॉ.विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादकांना चांगला भाव देवू, असे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यंनी सांगितले.
कारखान्यात 2020-21 च्या गाळप हंगामाची तयारी सुरु आहे. या हंगामासाठीच्या मिल रोलर पूजनावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
ढोकणे म्हणाले, कारखान्याची आर्थिक अवस्था थोडी बिकट असली तरी कारखान्याला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे, बँकेतील प्रश्नांसाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले आदींचे सहकार्य घेवू. मागील काही वर्षात खूप त्रास झाला पण आम्ही सुड भावनेने वागणार नाही ,नक्कीच ऊस उत्पादकांना चांगला भाव देऊ ,सभासदांनी ऊस बाहेरच्या तालुक्यातील कारखान्यांना देऊ नये असे त्यांनी आवाहन केले .
यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय ढूस, भाजपाचे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, शामराव निमसे, संचालक सुरसिंग पवार, भारत तारडे, कामगार यूनियनचे ज्ञानदेव आहेर आदी उपस्थित होते. महेश पाटील यांनी आभार मानले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.