लातूर : तळेगाव (ता. देवणी) येथील जागृती साखर कारखान्यात आगामी गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, महर्षी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. देशमुख म्हणाले, राज्यातील खासगी साखर कारखान्यांमध्ये एफआरपीपेक्षा जादा दर देणारा कारखाना म्हणून जागृती साखर कारखाना ओळखला जातो. उसाला जास्तीत जास्त दर देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनविण्याचे काम कारखान्याने केल्याचे मतही देशमुख यांनी व्यक्त केले.
कारखान्याच्या अध्यक्षा सौ. गौरवी अतुल भोसले यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख जपली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार त्रिंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष यशवंतराव पाटील, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने आदी उपस्थित होते.