पुणे : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ या गळीत हंगामाची पूर्वतयारी सुरू केली आहे. कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करून ऑक्टोबर महिन्यात कारखाना गाळपासाठी सज्ज राहील. कारखान्याचे संस्थापक संचालक तसेच सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा १० लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. गाळप हंगाम २०२४-२५ साठी मिल रोलरचे पूजन कारखान्याचे अध्यक्ष बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
लवकरच ऊस तोड, वाहतूक टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायर बैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार सुरू केले जातील असे चेअरमन बेंडे यांनी सांगितले. तर उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले की, मागील वर्षातील सभासद व ऊस उत्पादकांना सवलतीच्या दरातील साखर वाटपाचा कालावधी वाढवून तो सप्टेंबर २०२४ पर्यंत केला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी साखर वाटप करण्यात येणार आहे. यावेळी संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, दादाभाऊ पोखरकर, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, ब्रिजेश लोहोट, चंद्रशेखर मगर, अनिल बोंबले, सुनील कालेकर, अमीर पठाण, कैलास गाढवे आदी उपस्थित होते.