हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
कोल्हापूर, ता. 31 : राज्य शासनाची कर्ज मंजूर होऊनही राज्य सहकारी बँकेने हे कर्ज कारखान्यांना दिलेले नाही. त्यामुळे शेतक-यांना उसाची रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम देण्यासाठी अडचणी येत आहे. बँकांनी तत्काळ सॉफ्टलोन दिले पाहिजे यासाठी राज्य सहकारी साखर संघांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. देशात आणि राज्यात सलग दुस-या वर्षी विक्रमी साखर उत्पादन झाले आहे. यंदाच्या (2018-19) गाळप हंगामामधे १०७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे यंदा एफआरपी देण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षीत आणि पूर्ण रक्कम मिळाली नाही.
जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात शेतक-यांनी थकीत एफआरपीसाठी आंदोलनही केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने २ मार्च रोजी साखर कारखान्यांसाठी सॉफ्टलोनची योजना जाहीर केली. या योजनेनुसार कर्जाची उचल ३१ मेपूर्वी करणे आवश्यक होते. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. त्यात मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेतला. तसेच, साखर आयुक्त व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांशीदेखील चर्चा करणार असल्याचे साखर संघाच्या अधिका-यांनी सांगितले.