मुंबई : महाराष्ट्रात यंदा ऊस आणि साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले आहे. महाराष्ट्राने साखर उत्पादनात उत्तर प्रदेशलाही मागे टाकले आहे. या हंगामात ऊसाचे उत्पादन एवढे वाढले आहे की, कारखान्यांना गळीत हंगामाचा कालावधी वाढवावा लागला आहे. मराठवाडा विभागातील ऊसाची अधिक उपलब्धता पाहता काही कारखान्यांनी गाळप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखाने आणि राज्य सरकारने एकही ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस गाळपाविना शिल्लक राहू नये यासाठी पावले उचलली आहेत. यावर्षी मराठवाडा विभागात विक्रमी ऊस उत्पादन झाले आहे.
साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १८० दिवसांचा असतो. मात्र, यंदा गाळप प्रक्रिया एप्रिल-मेपर्यंत सुरू राहील. मराठवाड्याच्या शेजारच्या जिल्ह्यांतील कारखान्यांनाही गाळप सुरू ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये २० मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०७२.५८ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ११११.६४ लाख क्विंटल (१११ लाख टन) साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३६ टक्के आहे.
इस्माने आपल्या दुसऱ्या संभाव्य अनुमानात महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामातील साखर उत्पादन ११७ लाख टनाच्या तुलनेत १२६ लाख टन (इथेनॉल डायव्हर्शन नंतर) होण्याची शक्यता वर्तविली आहे.