नवी दिल्ली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी शेट्टी यांनी त्यांच्याशी शेतकऱ्यांशी संबधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. राजू शेट्टी यांनी मंत्री मंत्री नितीन गडकरी यांना केंद्र सरकारला इथेनॉलच्या किमतीमध्ये वाढ करण्यासह साखर निर्यातीच्या धोरणावरही मार्ग काढण्याची मागणी केली.
शेट्टी म्हणाले, देशातील साखर उद्योग स्थिर करण्यासाठी साखरेचा किमान बाजारभाव प्रतिकिलो 38 रुपये असावा. यासोबतच इथेनॉलच्या दरातही वाढ झाली पाहिजे. साखर निर्यात धोरणावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी मंत्री गडकरी यांच्याकडे केली. याबाबत केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे शेट्टी म्हणाले.
राजू शेट्टी म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी वगळता सोयाबीन, कापूस, कांदा, धान उत्पादक शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने इथेनॉलचे धोरण स्वीकारल्याने साखर उद्योगाला थोडे बरे दिवस आले आहेत, असे सांगून शेट्टी म्हणाले की, उसाचा उत्पादन खर्च खूप वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे या वर्षी F.R.P. पेक्षा जादा दर दिल्याशिवाय शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च भरून निघणे अशक्य आहे.