देहरादून: कोरोना महामारीचा प्रकोप पाहता उत्तराखंडच्या ऊस मंत्री स्वामी यतीश्वरानंद यांनी राज्यातील साखर कारखान्यांना ऑक्सिजन उत्पादनासाठी प्रकल्प स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊस विकास तथा साखर उद्योगाचे सचिव चंद्रेश कुमार यांना मंत्री यतीश्वरानंद यांनी पत्र लिहून निर्देश दिले आहेत.
यतीश्वरानंद यांनी म्हटले आहे की, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात उस्मानाबाद साखर कारखान्याने ऑक्सिजन प्लांट सुरू केला आहे, तशाच पद्धतीने राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठीच्या योजनेवर काम सुरू केले पाहिजे. मंत्र्यांनी उस्मानाबाद येथील धाराशिव साखर कारखान्याच्या प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधला. तसेच उत्तर प्रदेशमध्येही अशाच पद्धतीने माहिती घेतल्यानंतर तेथे डझनभर साखर कारखान्यांनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची तयारी सुरू केल्याचे लक्षात आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या कारखान्यांमध्ये इथेनॉल उत्पादन होते, अशा कारखान्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करणे सहजशक्य असल्याची माहिती त्यांना मिळाली.
यासाठी विभागाने गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशापूर्वी इथेनॉल उत्पादन करणाऱ्या हरिद्वार जिल्ह्यातील दोन साखर कारखाने, लक्सर साखर कारखाना आणि उत्तम साखर कारखान्याने मेडिकल ऑक्सिजन उत्पादनास सहमती दर्शविली आहे. एका महिन्यात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची तयारी सुरू केली असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे राज्याला कोरोना महामारीच्या काळात मोठा दिलासा मिळणार आहे. सार्वजनिक आणि सहकारी क्षेत्रातील इतर कारखान्यांत ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.