नवी दिल्ली : युक्रेन सोबत सुरू असणाऱ्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा दाखला देत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांच्या सीईओ आणि ऑटोमोबाईल लॉबी समूह SIAMच्या प्रतिनिधींकडे फ्लेक्स-फ्लूएल व्हेरिएंटमधील वाहने रोल आउट करण्यास गती देण्याचा आग्रह धरला. गडकरी म्हणाले की, या पर्यायी इंधनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि ऊर्जेची गरज भागविण्यासाठी आयात पेट्रोल, डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रात पेट्रोल, डिझेलचे सर्वाधिक ग्राहक आहेत. युद्ध आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींनी आम्हाला पर्याय शोधण्याची वेळ आली आहे. फ्लेक्स फ्यूएल वाहने आगामी काही वर्षात महत्त्वभूर्ण भूमिका निभावतील.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मंत्री गडकरी यांनी मॅन्युफॅक्चरर्सना मॅन्युफॅक्चरिंग इंजिनच्या मार्गात येणारे अडथळे दूर करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे. ही वाहने ई २० पासून ई ८५ मिश्रीत पेट्रोल आणि निव्वळ पेट्रोल अशी धावू शकतील.
यांदरम्यान, गेल्या दोन आठवड्यात, सरकारने इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे प्रमुख सचिव पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली दोन उच्च स्तरीय आंतर मंत्रालयीन बैठक घेतली. सर्व संबंधीत एजन्सींनी एप्रिल २०२५ पर्यंत देशात किमान २० टक्के इथेनॉल मिश्रण व्हावे याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारतात सध्याच्या सरासरी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम जवळपास ८.३ टक्के झाले आहे. तर काही राज्यांत हे मिश्रण १० टक्के अथवा त्यापेक्षा अधिक आहे.