नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने इतर देशांसोबत डॉलर ऐवजी रुपयामध्ये व्यापाराला प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. या बैठकीस बँकांच्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफर्ससना (सीईओ) बोलावण्यात आले आहे. यामध्ये खासगी क्षेत्रातील प्रमुख सहा बँकांच्या सीईओंचा समावेश आहे. पाच डिसेंबर रोजी ही बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. परराष्ट्र मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती राहील. बैठकीत आतापर्यंत झालेल्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वित्त सेवा सचिव विवेक जोशी असतील. बैठकीला भारतीय रिझर्व्ह बँक आणि इंडियन बँक्स असोसिएशनचे (आयबीए) प्रतिनिधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये, आरबीआयने विदेशांमध्ये रुपयांमध्ये व्यापार सौद्यांसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुपयामध्ये परदेशातील व्यापार सुलभ बनविण्यासाठी आतापर्यंत दोन देशांतर्गत बँकांमध्ये नऊ स्पेशल व्होस्ट्रो अकाऊंट उघडण्यात आली आहेत. व्होस्ट्रो खाती ही देशांतर्गत बँकांनी परदेशी बँकांसाठी स्थानिक चलनात उघडलेली खाती आहेत. विशेष व्होस्ट्रो खाते उघडण्याच्या हालचालीमुळे भारत आणि रशिया यांच्यातील रुपयातील व्यापाराचा मार्ग मोकळा झाला होता.