विकसित आणि समृद्ध लडाखच्या निर्मितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’ प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये या ऐतिहासिक निर्णयाची माहिती देताना म्हटले आहे की, या निर्णयामुळे झंस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या नवीन जिल्ह्यांमध्ये प्रशासन सुदृढ झाल्यामुळे स्थानिक लोकांना त्यांच्या दारी सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर आता लडाखमध्ये लेह आणि कारगिलसह एकूण सात जिल्हे असतील.
लडाख हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने खूप मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. सध्या लडाखमध्ये लेह आणि कारगिल असे दोन जिल्हे आहेत. हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक आहेत. अत्यंत कठीण आणि दुर्गम प्रदेश असल्यामुळे सध्या जिल्हा प्रशासनाला तळागाळापर्यंत पोहोचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर आता केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाच्या सर्व लोककल्याणकारी योजना लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतील आणि अधिकाधिक लोक त्यांचा लाभ घेऊ शकतील. केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय लडाखच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
पाच नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीला “तत्त्वतः मान्यता” देण्याबरोबरच, गृह मंत्रालयाने लडाख प्रशासनाला नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीशी संबंधित विविध पैलूंचे उदा. मुख्यालय, सीमा, रचना, पदांची निर्मिती, जिल्हा निर्मितीशी संबंधित इतर कोणत्याही बाबी आदींचे मूल्यांकन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यास आणि त्याचा अहवाल तीन महिन्यात सादर करण्यास सांगितले आहे. सदर समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश लडाख या अहवालाच्या आधारे नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवेल.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी भरघोस संधी निर्माण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
(Source: PIB)