‘मिशन ऊस’ द्वारे उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी तयार केलेले संकल्प पत्र राज्यातील गरीब, शेतकरी आणि तरुणांना सक्षम करेल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मंगळवारी त्यांनी जनचौपालमध्ये सहभागी होत रामपूर, बदांऊ, संबळ येथील मतदारांशी संवाद साधला. हे संकल्प पत्र म्हणजे चांगल्या कृषी अर्थव्यवस्थेचा रोड मॅप आहे असे मोदी म्हणाले.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, नव्या साखर कारखान्यांची उभारणी, जुन्या कारखान्यांचे आधुनिकीकरण यासाठी हजारो कोटी रुपयांची तरतुद करून मिशन ऊस राबविण्यात येणार आहे. याद्वारे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल. सरदार वल्लभभाई पटेल ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चर मिशन उत्तर प्रदेशातील सॉर्टिंग आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड चेन चेंबर्स, गोदामे आणि प्रक्रिया केंद्रांच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
ते म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांच्या तुलनेत इथेनॉल उत्पादन वाढले आहे. गेल्या पाच वर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून सुमारे १२,००० कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी करण्यात आले आहे. राज्यात जैव इंधनाचे कारखाने उभारणीस गती आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेसाठी सात टप्प्यात निवडणूक होत आहे. फेब्रुवारी महिन्यात १०, १४, २०, २३ आणि २७ असे पाच टप्प्यातील मतदान होईल. तर मार्च महिन्यात ३ आणि ७ रोजी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होईल. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ४०३ पैकी ३१२ जाांवर विजय मिळवला होता. पक्षाने निवडणुकीत ३९.६७ टक्के मते मिळवली. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला ४७, बहुजन समाज पक्षाला १९ आणि काँग्रेसला ७ जागा जिंकता आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here