नवी दिल्ली : देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन देणे हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे, कारण यातून इंधन आयात कमी करण्यास मदत मिळणार आहे, असे प्रतिपादन पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले. मंत्री तेली म्हणाले की, मेघालय आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये तेल आणि नैसर्गिक गॅसचा शोध लवकरच सुरू होईल. ते म्हणाले की, केंद्र सरकार भारताच्या ऊर्जात्मक गरजांमध्ये स्वावलंबी होण्याच्या उद्देशाने यावर लक्ष केंद्रीत करीत आहे.
तेली यांनी मंगळवारी शिलाँग येथील एका कार्यक्रमात सांगितले की, केंद्र सरकार शेतकऱ्यांना इथेनॉल उत्पादनात सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहन देईल. यातून त्यांना आपले उत्पन्न वाढीसाठी मदत मिळणार आहे.
भारताचे २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.