अहिल्यानगर : वृद्धेश्वर साखर कारखान्याने साखर उद्योगातील बदल आत्मसात करताना प्रतिवर्षी ते बदल अंगीकारले. इतरांच्या तुलनेत ऊस दर दिला. गाळप क्षमता वाढवून वृध्देश्वर कारखाना अंतर्गत मशिनरीचे आधुनिकीकरण करीत आहे, असा विश्वास कारखान्याचे चेअरमन अप्पासाहेब राजळे यांनी दिला. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, व्हा. चेअरमन रामकिसन काकडे, सभापती सुभाष बर्डे, नारायण धस यांच्यासह संचालक मंडळ व्यासपीठावर होते. सभेत ऊस लागवड, तोडणी वाहतूक, ऊस दर व वजनाबाबत पाडळी येथील भाऊसाहेब कचरे, बाळासाहेब गर्जे, शिवशंकर राजळे यांनी काही शंका उपस्थित केल्या. सरपंच अशोक गर्जे यांनी समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे आरोप प्रत्यारोप रंगले.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या की, निवडणुका नजरेस ठेवून सहकारी बँक सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनावर अशोभनीय आरोप सुरू आहेत. खाजगी कारखान्यांमुळे स्पर्धा वाढलीय. स्पर्धेत तग धरण्यासाठी सहकारी संस्थांना अडचणी येत आहेत. मात्र, सहकारातील सार्वत्रिक विश्वासाची पन्नास वर्षांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत. गाळप वाढवण्यासाठी मशिनरी सुधारणा आवश्यक आहे. वाढीव गाळप क्षमता नजरेस ठेवूनच संचालक मंडळ काम करीत आहे. रवींद्र महाजन यांनी प्रास्ताविक केले. राहुल राजळे यांनी आभार मानले. कार्यकारी संचालक अमोल पाटील, लेखापाल संभाजी राजळे, उद्धवराव वाघ यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.