सहारनपूर : भाजप सरकार उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. साखर बाजारातील दराची अस्थिरता संपविण्यासाठी उसाचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी केला जाईल असे ते म्हणाले.
सहारनपूरमध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान म्हणाले, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहा वर्षात आधीच्या सरकारांच्या तुलनेत अधिक पैसे दिले आहेत. भाजप सरकारचा हा इतिहास आहे, आमची परंपरा आहे की आम्ही सर्व आश्वासने पूर्ण करतो. आमच्या सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधीपेक्षा जादा पैसे मिळवून दिले आहेत. उसावर आधारित इथेनॉलपासून १२००० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे असे त्यांनी सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केवळ उसापासून साखर नव्हे तर इथेनॉलही उत्पादन करता येते असे पंतप्रधान म्हणाले.