सांगली : मोहनराव शिंदे कारखान्याने साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी केले. कारखान्याच्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे-म्हैसाळकर होते. केंद्र सरकारने डिसेंबर २०२३ मध्ये इथेनॉल उत्पादनावर निर्बंध लादले. या निर्णयाने कर्जे उभारून उभारणी केलेले प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ साखर कारखानदारांवर आली. आता यंदाचा हंगाम चांगला व्हावा यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कारखान्याच्या सभासदांनी परिपक्व उसाचे उत्पादन घेऊन चांगल्या प्रतीचा ऊस मोहनराव शिंदे कारखान्यास पाठवावा असे आवाहन त्यांनी केले.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंदे म्हैशाळकर म्हणाले की, गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व परिपक्व ऊस हा कारखान्यास देऊन सहकार्य करावे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या प्रतिमेचे पूजन यशवंत भगत यांच्या हस्ते झाले. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सिद्धू पाटील यांनी केले. सूर्यकांत पाटील यांनी नोटीस वाचन केले तर विजयसिंह भोसले यांनी अहवाल वाचन केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. आमदार मोहनरावजी शिंदे (बाबा) – म्हैसाळकर यांचा कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या सभासदांच्यावतीने ठराव मांडण्यात आला. यावेळी बाळासाहेब पाटील, बापूसाहेब बुरसे, बाळासाहेब होनमोरे, सुरेश कोळेकर, लतिफराव सावंत, वास्कर शिंदे, खंडेराव जगताप, विराज कोकणे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.