‘श्री शंकर’ च्या निवडणुकीत मोहिते-पाटलांनी मारली बाजी, विरोधकांचे डिपॉझिट जप्त

सोलापूर : सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या १९ जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. तर उर्वरीत दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीतही मोहिते-पाटील गटाने विजय मिळविला. कारखान्याच्या सर्वच्या सर्व २१ जागा जिंकून मोहिते-पाटील गटाने विजयाचा गुलाल उधळला.

दोन जागांसाठी ६५.६३ टक्के मतदान झाले होते. निवडणुकीत माळशिरस उत्पादक गटातून मोहिते-पाटील गटाचे ॲड. मिलिंद कुलकर्णी (३५५८), ॲड. सुरेश पाटील (३५५३) व महादेव शिंदे (३४८९) यांना एवढे मतदान झाले. इस्लामपूर उत्पादक गटातून मोहिते-पाटील गटाचे बाळासाहेब माने (३५६८), दत्तात्रय रणवरे (३४८९) व कुमार पाटील (३५३६) अशी मते मिळाली.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने घवघवीत यश मिळवले. २५ फेब्रुवारी रोजी १५ केंद्रांवर मतदान घेण्यात आले. २६ रोजी मतमोजणी झाली. त्यामध्ये मोहिते- पाटील गटाचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार विजयी घोषित करण्यात आले.

माळशिरस तहसील कार्यालयाच्या बाहेर मोहिते-पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी हलग्यांच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले की, चार वर्षे बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने तसेच स्वत:ची जागा-जमीन तारण ठेवून कारखान्यासाठी पैसे उभे केले. कारखाना नव्या जोमाने सुरू केला. त्यामुळे मतदारांनी विकासाला साथ दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here