मेरठ : जवळपास ३५ दिवसांनंतर मोहिउद्दीनपूर साखर कारखान्याचे कामकाज आजपासून सुरू होत आहे. पूजा-अर्चा करून सकाळी कारखाना सुरू केला जाईल. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या महिन्यात, २६ नोव्हेंबर रोजी कारखान्यात आगीचा प्रकार घडल्यानंतर कामकाज बंद पडले होते. त्यामुळे गळीत हंगामास उशीर झाला. त्यातून उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच पडून आहे आणि गव्हाच्या पेरणीसाठी उशीर झाला आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, दरवर्षी गळीत हंगामात मोहिद्दीनपूर कारखान्याकडून जवळपास ६५ लाख क्विंटल उसाचा गाळप केले जाते. कारखाना बंद झाल्याने ऊस इतर कारखान्यांकडे वळविण्यात आला. मात्र, ही व्यवस्था करण्यास खूप उशीरा झाला. त्यामुळे गाळप सुरू होवून दोन महिने उलटल्यानंतरही आठ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. आता कारखाना पुन्हा सुरू झाल्याने हंगामाला वेग येईल. आगीच्या घटनेत इंजिनीअरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ऊस मंत्री आणि ऊस आयुक्तांनी कारखान्याची पाहणी केली होती. कारखाना दहा दिवसात पूर्ववत झाला होता. मात्र, टर्बाइनची दुरुस्ती पूर्ण होवू शकली नव्हती. कारखान्याचे सरव्यवस्थापक शिशपाल सिंह यांनी सांगितले की, आता विजेवर कारखाना चालविण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी सहा मेगावॅट विजेचे कनेक्शनही घेण्यात आले आहे. त्याची चाचणी पूर्ण झाली आहे.
कारखाना सुरू नसल्याने अडचणी येत होत्या. आता त्या दूर होतील आणि गव्हाची पेरणीही करता येईल असे शौलाना गावातील शेतकरी मेहबूब अली यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात गव्हाची पेरणी अपेक्षित होती. मात्र, कारखाना बंद पडल्याने ऊस शेतातच राहिला. आता ऊस तोडणी होऊ शकेल असा विश्वास डिंडाला गावातील शेतकरी मोनू यांनी व्यक्त केला. तर मेरठचे जिल्हा ऊस अधिकारी दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, आजपासून कारखाना सुरू होत आहे. त्याची चाचणी घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणुकही लवकरच केली जाईल.