नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम मान्सून राजस्थान, हरियाणा, पंजाबसह उर्वरित भागात पुढे सरकल्याने रविवारी, सामान्य अनुमानाच्या आधी सहा दिवस मान्सून देशभरात पोहोचला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, पूर्व उत्तर प्रदेश आणि दक्षिण बिहार वगळता देशभरात जुलै महिन्यात मान्सून सामान्य राहील. आठ जुलैपूर्वी मान्सून देशभरात पोहोचल्याचे आयएमडीने म्हटले आहे. जून महिन्यात १६ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांमध्ये पाऊस कमी झाला आहे.
याबाबत टाइम्स नाऊ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, जून महिन्यात बिहारमध्ये ६९ टक्के कमी पाऊस झाला. तर केरळमध्ये ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यात दक्षिण-पश्चिम मान्सून जून महिन्यात सामान्यपेक्षा कमी स्थितीत आला.
आयएमडीने म्हटले आहे की, जुलै महिन्यात देशात सरासरी सामान्य मासिक पाऊस राहील अशी शक्यता आहे. एलपीएचे ९४ ते १०६ टक्के असे प्रमाण राहू शकते. तर पुढील पाच दिवसांत दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, बंगालसह पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो. मात्र, मैदानी भागात कमी पावसाची शक्यता आहे. स्कायमेट वेदरच्या म्हणण्यानुसार, पुढील २४ तासात पूर्वोत्तर राज्य सिक्कीम, आसाम, दक्षिणेत अंदमान – निकोबार द्वीपसमूह, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस कोसळेल. तमिळनाडूच्या किनारपट्टीवर हलका ते मध्यम आणि जोरदार पाऊसही कोसळू शकतो.