नवी दिल्ली : दक्षिण भारतानंतर आता मॉन्सून दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्वोत्तर भागात पसरला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आगामी तीन दिवसात पश्चिम बंगाल आणि शेजारी भागात खालच्या स्तरावर असलेल्या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूरसारख्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होईल. सध्या मॉन्सून देशाच्या अनेक भागांना स्पर्श करीत मध्य-अरबी समुद्राकडे वळला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा समावेश असल्याचे आयएमडीने सांगितले.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात मॉन्सून रायगड, पुणे जिल्ह्यात पोहोचला. रात्री या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. पुढील आठवड्यात पाऊस मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. तर १५ जूनपर्यंत पाऊस मध्य आणि पूर्वोत्तर भारतात सक्रीय होईल. मध्य प्रदेश, गुजरात, दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशात २० जूननंतर मॉन्सून पोहोचण्याची शक्यता आहे. यावर्षी नेहमीपेक्षा अधिक पाऊस होईल असा दावा आयएमडीने केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा गतीने मान्सून महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदर परिसरात पोहोचला. दक्षिण-पश्चिम मॉन्सून आता मध्य अबरी समुद्र, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तामीळनाडूच्या किनारपट्टीवर असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे.
यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता असून ओडीसा, झारखंड, पश्चिम बंगालच्या काही भागात झपाट्याने तापमान घसरले आहे. यावर्षी ९० ते १०४ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. साधारणतः ११ जूनपर्यंत देशाच्या अनेक भागांना पावसाने व्यापलेले असेल असे सूत्रांनी सांगितले.