नवी दिल्ली : मान्सूनचे पूर्ण देशात आगमन झाले आहे. बहुतांश राज्यांत पाऊस जोरदार कोसळत आहे. पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला असून त्यासोबतच खरीप हंगामाबाबतच्या इतर समस्याही दूर झाल्या आहेत. देशातील अवघ्या काही ठिकाणी पाऊस अद्याप पडलेला नाही. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) सांगितले की, दक्षिण-पश्चिम मान्सून देशात पोहोचला असून तो आता राजस्थान, पंजाब आणि हरियाणाच्या उर्वरीत भागात पुढे सरकत आहे.
टाइम्स नाऊमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयएमडीच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुढील पाच दिवसांत जोरदार पाऊस कोसळेल. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना आयएमडीचे वरिष्ठ संशोधक डॉ. नरेश कुमार यांनी सांगितले की, मान्सून खास करुन पूर्वोत्तर राज्यात सक्रिय आहे. या ठिकाणी पुढील पाच दिवसात जोरदार पाऊस कोसळेल. दक्षिण युपीच्या मध्य भागातील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे युपीमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. २ ते ७ जुलै या कालावधीत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. उत्तर बंगालसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आयएमडीने केरळ, महाराष्ट्र, मन्नारची खाडी आणि लक्षद्वीपच्या किनारपट्टीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सहा जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कर्नाटक, किनारपट्टीचा भाग, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी येथेही चांगला पाऊस कोसळेल असे अनुमान आयएमडीने वर्तवले आहे.