मुंबई : केरळमधून उशीरा आलेला मान्सून आता सगळीकडे हजेरी लावत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सून पोहोचण्याची आवश्यकता होती. मात्र, पाऊस अजिबात न पडल्याने शेतकरी हवालदिल आहेत. दरम्यान, अबरी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने कोकणात पोहोचल्यानंतर मान्सूनची गती संथ केली. त्यामुळे महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा बसला. आता हवामान विभागाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. मान्सूनबाबत नवे अनुमान जारी करण्यात आले आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, मान्सून विदर्भासह मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीत सक्रिय राहिल. मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने सांगितले की, पुढील दोन दिवस, म्हणजे २४ आणि २५ जून रोजी याची तिव्रता वाढेल.
मोसमी वाऱ्यांमुळे हवामान अनुकूल बनले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून सर्वत्र सक्रिय झाल्याचे दिसून येईल. हवामान विभागाने सांगितले की, शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेवून पेरण्या सुरू कराव्यात.
हवामान विभागाच्या अनुमानानुसार, मुंबईत २४ जून रोजी मान्सून प्रवेश करेल. चक्रीवादळामुळे दक्षिण-पश्चिम मान्सूनची हवा संथ झाली आहे. यावर्षी मान्सून चंद्रपूरमार्गे विदर्भात प्रवेश करेल असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. मुंबई आणि नागपूर हवामान केंद्रांनी याची माहिती दिली आहे.