मुंबई : मान्सूनची प्रतीक्षा करीत असलेल्या महाराष्ट्रासाठी चांगले वृत्त आहे. महाराष्ट्रात थांबलेला मान्सून लवकरच वेग घेईल असे हवामान विभागाने म्हटले आहे. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात मान्सून राज्यात पुढे सरकेल असे मुंबई आणि नागपूरच्या हवामान विभागाने म्हटले आहे.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय हवामान विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी याबाबत ट्वीट केले आहे. २३ जूनपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. २४ व २५ जून पासून पावसाची तिव्रता वाढेल. यादरम्यान मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळेल. मराठवाड्यात २२ ते २३ जूननंतर पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पाऊस नसल्याने खरीपाच्या पेरण्यांमध्ये अडथळे आले आहेत. हवामान विभागाने आज नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.