अहिल्यानगर : हिरडगाव येथील गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर चार साखर कारखाना सुरू झाल्याने शिरूरच्या पूर्व भागातील अनेक गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने ऊस लागवड करण्यासाठी लागवड धोरण जाहीर केले, परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कल गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याकडे असल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाची नोंद देण्यासाठी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.
गेल्या गळीत हंगामामध्ये घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद राहिला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील नव्या गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस तोडला गेला. गौरी शुगरने १५ दिवसांमध्येच उसाची बिले जमा करून शेतकऱ्यांचे समाधान केले. त्यामुळे येणाऱ्या गळीत हंगामात गौरी शुगरला अधिक ऊस देण्यास शेतकऱ्यांची पसंती राहणार असल्याचे कार्यकारी संचालक एम. टी. यादव यांनी सांगितले. शेती अधिकारी विकास क्षीरसागर, सुनील साठे, शंकर गदादे, शशिकांत चकोर, माऊली जगताप, दिलीप जगताप, सचिन जगताप, कृष्ण वराळे आदी उपस्थित होते.