साओ पाउलो : ब्राझील सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण २७ टक्क्यांवरुन वाढवून ३० टक्के करण्याचा प्रस्ताव तयार केल्याने इथेनॉल उत्पादनासाठी देशातील अतिरिक्त ३.५ टक्के साखरेचा वापर केला जाऊ शकेल, असे Citi रिसर्चच्या एका अभ्यासात आढळून आले आहे. सरकार या प्रस्तावावरील विधेयकाचा एक मसुदा काँग्रेसकडे पाठवणार आहे. हे विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. कारण इथेनॉल उद्योगाला राजकीय पक्षातील शक्तिशाली सत्ताधारी कृषी गटाचा पाठिंबा आहे.
सिटीचे विश्लेषक गेब्रियल बर्रा म्हणाले की, जर यास मंजुरी मिळाली तर कायदेशीरदृष्ट्या ब्राझीलमध्ये २०२४-२५ या हंगामात इथेनॉलचा खप १.२ बिलियन लिटरने वाढून ३६ बिलियन लिटर होईल. ब्राझीलियन इथेनॉल जवळपास ९० टक्के उसापासून बनते. तर उर्वरित मक्यापासून तयार केले जाते. साखर कारखाने आणखी इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी उसापासून काढण्यात आलेल्या शुक्रोजचा वापर करतील.
इथेनॉल मिश्रणातील वाढीमुळे साखरेचे उत्पादन मर्यादीत होईल. जैव ईंधनाचा वापर करण्यास प्रोत्साहन देणारे इतर देशही या समस्येचा सामना करीत आहेत. फिंच सोल्यूशन्सचे संशोधन युनिट बीएमआयने या महिन्याच्या सुरुवातीला आपल्या एका अहवासात म्हटले होते की, भारताच्या इथेनॉल कार्यक्रमामुळे भविष्यात देशाच्या साखर निर्यातीवर निर्बंध येवू शकतात.