पुणे : जगातील साखर बाजारातील बदलत्या धोरणानुसार सतर्क राहणे आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेत भारताची भूमिका कायम महत्वाची राहिलेली आहे. आगामी काळातही भारत हा जागतिक बाजारपेठेत मजबूत राहण्यासाठी व्यापारातील बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे साखर निर्यातीमधून चांगला फायदा मिळवण्यासाठी कारखान्यांनी उच्च गुणवत्ता राखण्यावर भर दिला पाहिजे. साखर कारखान्यांना भविष्यात निर्यातीच्या संधी वाढू शकतात, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. पुणे येथे कॉफको इंटरनॅशनलच्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सहकार्याने आयोजित शुगर कनेक्ट २०२५ या परिसंवादामध्ये ते बोलत होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, जागतिक व्यापारामध्ये महाराष्ट्र राज्याची भूमिका कौतुकास्पद आहे. २०२१-२२ च्या हंगामात भारताने ११० लाख टन साखरेची विक्रमी निर्यात केली, तेव्हा त्यात महाराष्ट्राचे ७० टक्के पेक्षा अधिक योगदान होते. कार्यक्रमात जगातील साखर व्यापारासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी प्रास्ताविक केले. कॉफको इंटरनॅशनलचे साखर व्यापाराचे जागतिक प्रमुख जोस एडुआर्डो टोलेडो आदीनी मनोगत व्यक्त केले. ‘कॉफको’चे भारतीय उपखंडातील साखर विभागाचे प्रमुख रवी कृष्णमूर्ती यांनी आभार मानले.