गेल्या एका वर्षात, 1 लाख 60,000 शेतकऱ्यांनी बायोटेक-किसान योजनेचा लाभ घेतला- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

गेल्या एका वर्षात (जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत) 1 लाख 60,000 शेतकऱ्यांना बायोटेक-किसान योजनेचा लाभ मिळाला आहे अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालयातील तसेच कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन आणि अणुउर्जा तसेच अवकाश विभागाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत दिली.

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सल्ला देणे तसेच, पाणी, मृदा, बियाणे तसेच विपणन यांच्या संदर्भात त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर उपाययोजना सुचविणे या उद्देशाने बायोटेक-किसान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

सदर योजनेतून सुधारित प्रतीचे बियाणे, लागवडीसाठी भाज्यांची रोपे, रोपांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या रायझोबॅक्टेरिया प्रकारच्या जीवाणूंच्या/जैविक खतांच्या वापराबाबतचे हस्तक्षेप, सिंचन तसेच संरक्षित लागवड तंत्रज्ञाने, सुधारित पशुधन (बकऱ्या,डुकरे), कुक्कुटपालन आणि मासेमारी तसेच पाळीव पशु आणि कोंबड्यांचे आरोग्यविषयक व्यवस्थापन यांच्याशी संबंधित प्रश्नांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच सादरीकरण यांच्या सुविधा उपलब्ध केल्या जातात.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here