निवडणुकांची घोषणा आणि आदर्श आचारसंहिता अंमलात आल्यानंतर केवळ 20 दिवसांच्या कालावधीत सुविधा या मंचावर राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून परवानग्या मागणारे 73,379 इतक्या मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी 44,626 विनंत्या (60%) मंजूर करण्यात आल्या आहेत. सुमारे 11,200 विनंत्या नाकारण्यात आल्या आहेत, ज्या एकूण विनंत्यांच्या 15% आहेत, आणि 10,819 अर्ज अवैध किंवा नक्कल असल्याचे आढळल्यावर रद्द करण्यात आले आहेत. 7 एप्रिल 2024 पर्यंत उपलब्ध असलेल्या तपशीलानुसार उर्वरित अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे.
तामिळनाडूमधून सर्वाधिक (23,239) विनंत्या प्राप्त झाल्या, त्याखालोखाल पश्चिम बंगालमधून (11,976) आणि मध्य प्रदेशातून (10,636) विनंत्या प्राप्त झाल्या. सर्वात कमी विनंत्या चंदीगडमधून (17), लक्षद्वीपमधून (18) आणि मणिपूरमधून (20) प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या राज्यनिहाय अर्जांचा तपशील परिशिष्ट ए मध्ये दाखवला आहे.
मुक्त, न्याय्य आणि पारदर्शक निवडणुकांच्या लोकशाही सिद्धांताचा पुरस्कार करत सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्यासाठी, सुविधा पोर्टल म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेला एक तंत्रज्ञानविषयक तोडगा आहे. सुविधा पोर्टलने उल्लेखनीय कामगिरीचे दर्शन घडवत राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून निवडणुकीच्या काळात विविध प्रकारच्या परवानग्या आणि सुविधांची मागणी करण्यासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची स्वीकृती आणि त्यावरील प्रक्रिया अतिशय सुविधाकारक केली आहे.
निवडणूक प्रचाराच्या काळात पक्ष आणि उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. या काळाचे महत्त्व विचारात घेऊन प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर विविध प्रकारच्या परवानग्यांचा विचार करून, त्या देण्याचे काम करत आहे. प्रचारांच्या रॅलींचे आयोजन, तात्पुरत्या पक्ष कार्यालयांची उभारणी, दारोदार प्रचार, व्हिडिओ व्हॅन्स, हेलिकॉप्टर्स, वाहन परवाना प्राप्त करणे, पत्रकांचे वाटप करणे यांसाठी परवानग्या देण्याचे काम हे पोर्टल करत असते.
सुविधा पोर्टलविषयी माहिती – ईसीआय आयटी परिसंस्थेसाठी महत्त्वाचा वापर
सुविधा पोर्टल (https://suvidha.eci.gov.in) च्या माध्यमातून राजकीय पक्ष आणि उमेदवार अतिशय सहजतेने कोणत्याही वेळी, कोणत्याही भागातून परवानगीसाठी विनंती अर्ज पाठवू शकतात. त्या व्यतिरिक्त सर्व हितधारकांना समावेशकता आणि समान संधी सुनिश्चित करण्यासाठी ऑफलाईन सादरीकरणाचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
देशभरातील विविध राज्यांच्या विभागातील नोडल अधिकाऱ्यांकडून हाताळल्या जाणाऱ्या एका भक्कम आयटी मंचाच्या पाठबळाद्वारे हे सुविधा पोर्टल परवानगी मागणाऱ्या विनंती अर्जांवर अतिशय प्रभावी पद्धतीने प्रक्रिया करत असते. सुविधासोबत एक सहयोगी ऍप देखील आहे, जे अर्जदारांना वास्तविक वेळेत आपल्या विनंती अर्जाच्या स्थितीचा माग ठेवण्यासाठी मदत करते, ज्यामुळे अधिक जास्त सुविधा आणि पारदर्शकता प्राप्त होते. हे ऍप आयओएस आणि ऍन्ड्रॉईड मंचावर उपलब्ध आहे.
सुविधा हा मंच केवळ निवडणूक प्रक्रियेच्या कार्यक्षमतेमध्येच वाढ करत नाही तर आपल्या अर्जांचा वास्तविक वेळेत मागोवा घेणे, अद्ययावतीकरणाची स्थिती तपासणे, मुद्रांकित सादरीकरणांची वेळ यांची माहिती घेणे आणि एसएमएसद्वारे संवाद राखण्यासारख्या सुविधा देतो. त्याशिवाय या पोर्टलवर उपलब्ध असलेली परवानग्यांविषयीची माहिती निवडणूक खर्चाची छाननी करण्यासाठी, निवडणूक प्रक्रियेत अधिक जास्त उत्तरदायित्वामध्ये आणि एकात्मिकतेमध्ये योगदान देण्यासाठी एक बहुमूल्य संसाधन म्हणून काम करते.
(Source: PIB)