कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी एफआरपीचे पाडलेले तुकडे, कामगारांचे गेल्या वर्षभरापासून दिले नसलेले पगार, तोंडावर आलेला गळीत हंगाम अशा स्थितीतसुद्धा जिल्ह्यातील तब्बल 100 पेक्षाही अधिक साखर कारखानदार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आताच्या निवडणुकीत साखर पट्ट्यातील उमेदवार कुणाला कौल देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा साखर उद्योगातील बालेकिल्ला म्हणून ओळखण्यात येतो.
आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत साखर सम्राटाचा करिश्मा कायम राहिला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारांपासून काहीसे दूर असणार्या भाजपने यंदा 28 साखर कारखानदारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने साखर कारखान्यांशी संबंधीत असणार्या 30 जणांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेकडून यंदा 15 साखर कारखानदार रिंगणात उतरले असून, काँग्रेसनेही 12 साखर कारखानदारांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, राहुरी, कागल, माजलगाव, कोपरगाव, करमाळा, पंढरपूर, वाई, पाटण, करवीर, इस्लामपूर यासह 11 विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारांमध्ये थेट लढ होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात 54 जण आहेत तर मराठवाड्यातही 22 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. कारखानदारीच्या माध्यमातून महापालिकेपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी ठिकाणी आपल्या गटाची सत्ता कायम ठेवण्यासाठी कारखानदारांनी प्रयत्न केला आहे. तर लोकसभा निवडणुकीत सोयीसाठी मातब्बर उमेदवारास पाठिंबा आणि विधानसभेसाठी स्वत:ची उमेदवारी अशा तंत्राचा अवलंब आतापर्यंत केला आहे.
प्रमुख उमेदवार आणि त्यांचे साखर कारखाने-
पंकजा मुंडे : वैजनाथ सहकारी, परळी (भाजप)
अशोक चव्हाण : भाऊराव चव्हाण कारखाना, नांदेड (काँग्रेस)
राधाकृष्ण विखे : विठ्ठलराव विखे-पाटील कारखाना, प्रवरानगर (भाजप)
बाळासाहेब थोरात : भाऊसाहेब थोरात कारखाना, संगमनेर (काँग्रेस)
अजित पवार : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (राष्ट्रवादी)
हसन मुश्रीफ : संताजी घोरपडे कारखाना, कागल (राष्ट्रवादी)
अमित देशमुख : विकास सहकारी, लातूर (काँग्रेस)
सुधाकरपंत परिचारक : पांडुरंग कारखाना, श्रीपूर (भाजप)
अतुल भोसले : यशवंतराव मोहिते कारखाना, कराड (भाजप)
विश्वजित कदम : सोनहिरा कारखाना, पलूस-कडेगाव (काँग्रेस)
शंभूराज देसाई : बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, पाटण (शिवसेना)
सुभाष देशमुख : लोकमंगल साखर कारखाना, सोलापूर (भाजप)
संदिपान भुमरे : संत एकनाथ सहकारी कारखाना, पैठण (शिवसेना)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.