लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेले बहुतांश साखर कारखाने या महिन्याच्या अखेरीस बंद होण्याची शक्यता आहे. मात्र, काही कारखान्यांचा हंगाम जून २०२१ पर्यंत सुरू राहू शकतो. राज्याच्या पश्चिम विभागात सद्यस्थिती गाळप हंगाम काहीसा लांबला आहे. बहुतांश गुऱ्हाळघरे, खांडसरी युनीट लॉकडाऊनमुळे बंद असल्याने तेथील ऊस साखर कारखान्यांकडे वळला आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने नुकताच अहवाल जारी केला आहे. त्यानुसार उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १५ मे २०२१ अखेर १०८.७० लाख टन साखरेचे उत्पादन केले. गेल्यावर्षी याच कालावधीत झालेल्या १२२.२८ लाख टनापेक्षा हे उत्पादन १३.५८ लाख टनाने कमी आहे. यावर्षी गाळप सुरू केलेल्या १२२ पैकी ९९ कारखान्यांचा हंगाम संपुष्टात आला आहे. अद्याप २१ कारखान्यांचे गाळप सुरू आहे. तर गेल्यावर्षी १५ मे २०२० अखेर ४६ कारखान्यांचे गाळप सुरू होते.