अकोला : विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऊस पिकासाठी अनुकूल हवामान, जमीन आणि सिंचनाची व्यवस्था आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र वाढीसाठी वाव आहे. हे लक्षात घेऊन ऊस क्षेत्रातील शिक्षण, संशोधन आणि विकास कार्यासाठी येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये तथा प्रक्षेत्रावर ऊस पिकावर संशोधन करण्यात येणार आहे. यातून पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संशोधन, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आधुनिक प्रयोगशाळेमध्ये कार्य करण्याची संधी मिळणार आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका कार्यक्रमात हा सामंजस्य करार करण्यात आला. कृषी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे, कृषी विद्या विभागाचे प्रमुख डॉ. आदिनाथ पसलावार, कुलगुरू यांचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, डॉ. जे. पी. देशमुख आणि पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मुख्य संशोधक डॉ. अशोक कडलग, नीलेश खरोटे आणि सुनील मुंडे उपस्थित होते. डॉ. नितीन कोंडे यांनी सूत्रसंचालन केले. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी आभार मानले.