कोल्हापूर : राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना साखर निर्यातीबाबत कारखानदारांना दिलासा देण्याची विनंती केली आहे. महाडिक यांनी मंत्री गोयल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, Open General Licence (OGL) अंतर्गत अनेक साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी पाठविलेली साखर बंदरांपर्यंत पोहोचली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, OGL धोरणानुसार विविध साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी करार केले आहेत. ज्यापैकी काही प्रमाणात साखर बंदरांमध्ये कस्टम अधिसूचित क्षेत्रापर्यंत पोहोचली आहे. मात्र, अलिकडेच लागू केलेल्या निर्बंधांमुळे ERO (Export Release Order) उपलब्ध नसल्याने ही साखर निर्यात केली जाऊ शकत नाही. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडे (DFPD) कारखानदारांचे अर्ज प्रलंबित आहेत. संबंधितांकडून पडताळणी आणि आवश्यक छाननी करुन ३१ मे २०२२ रोजी बंदरात प्रत्यक्ष उपलब्ध असलेल्या साखरेला निर्यात रिलिज ऑर्डर जारी करून निर्यातीस परवानगी दिली जाऊ शकते, असेही त्यांनी सुचवले आहे.
खासदार महाडिक यांनी पुढे म्हटले आहे की, साखर कारखानदारांकडे शिल्लक असलेल्या साठ्यामधील कच्च्या साखरेला प्राधान्याने ERO जारी करण्याची गरज आहे. देशात कच्च्या साखरेचा खप खूप मर्यादीत आहे. त्याचे उत्पादन केवळ निर्यातीसाठीच केले जाते. गुणवत्तेच्या कारणामुळे याचा दीर्घकाळ साठा केला जावू शकत नाही. जर कच्ची साखर वेळेवर निर्यात केली गेली नाही, तर साखर कारखान्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे कृपया DFPD ला साखर कारखान्यांना कच्च्या साखरेच्या निर्यातीसाठी ERO जारी करण्याचे निर्देश देण्याची मागणी खासदार महाडिक यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे.