सातारा: पश्चिम महाराष्ट्रातील ५५ दुष्काळी तालुक्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरीव पॅकेज देण्यात यावे अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये सध्या कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत वाद सुरू आहेत. या वादात तेलंगणा राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा प्रश्न निकाली निघावा यासाठी केंद्र सरकारच्या स्तरावर प्रयत्न व्हावेत. त्यानंतर कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना प्रकल्प मार्गी लावावा, यासाठी विशेष योजना तयार करून ५५ दुष्काळी तालुक्यांसाठी विशेष पॅकेज देऊन हे सिंचन प्रकल्प मार्गी लावावेत अशी महत्त्वपूर्ण मागणी नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.
नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी त्यांच्या पत्नी अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, कन्या ताराराजे, इंदिरा राजे उपस्थित होत्या. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून न्याय देण्याची गरज आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यांना कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करणेसाठी विशेष भरीव पॅकेज देण्यासंदर्भात आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांचेकडे केली मागणी…#पश्चिम #महाराष्ट्र #दुष्काळी_तालुके #विशेष_पॅकेज_मागणी #PMO@BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/aaoS3kH6ob
— Ranjeetsinha Hinduraoji Naik Nimbalkar (@MP_Ranjeetsingh) March 24, 2023
राज्य सरकारने निरा देवघर प्रकल्पासाठी निधीची तरतूद केली आहे. प्रकल्पास आता केंद्र शासनाकडूनसुद्धा निधीची तरतूद व्हावी व या दुष्काळी पट्ट्यातील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली. ते म्हणाले की, दुष्काळी पट्ट्यातील धोम-बलकवडी प्रकल्प राज्य शासनाच्या माध्यमातून आठमाही होणार आहे. तो बारमाही करण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न व्हावेत. पंतप्रधानांनी गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे काटापूर योजनेसाठी निधी दिलेला असल्याने प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे असे खासदार निंबाळकर यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिले. या भागाचा आपण दौरा करावा असे निमंत्रणही दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकारात्मक भूमिका दर्शवत लवकरच हे प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही दिली.