हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीन मंडी
केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेचे मुल्यांकन वाढवले आहे. बँकेने १०० रुपयांनी मुल्यांकन वाढवले असून ते आता ३१०० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. सध्या कॅश फ्लो कमी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देताना अडचणीत आलेल्या साखर कारखान्यांना यांमुळे मदत होण्याची अपेक्षा आहे.
या संदर्भात राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. आर. देशमुख म्हणाले, ‘साखर कारखान्यांसाठी प्रति क्विंटल तारण रक्कम २ हजार ६३५ रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. त्यात बँकेची प्रति क्विंटल ७५० रुपये रिकव्हरी गृहित धरली तर कारखान्यांना ऊस बिल भागवण्यासाठी प्रति क्विंटल १८८५ रुपये मिळतील.’ या संदर्भातील परिपत्रक बँकेकडून साखर कारखान्यांना पाठवण्यात आले आहे.
यापूर्वी बँकेने प्रति क्विंटल साखरेचे ३ हजार रुपये मुल्यांकन केले होते. राज्याच्या काही भागात या महिन्यातच साखर हंगाम संपणार आहे. मराठवाड्यात काही साखर कारखान्यांनी काम थांबवण्याची तयारीही सुरू केली आहे. पण, प्रत्यक्षात १५ एप्रिलपर्यंत हंगाम चालण्याची शक्यता आहे. साखरेची किमान विक्री किंमत वाढवल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी तातडीने साखर विक्रीची टेंडर काढली आहेत. पण, बाजारपेठेतून अद्याप त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे सरचिटणीस मुकेश कुवेदिया म्हणाले, ‘किमान विक्री दर वाढणार याची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी साखर उचलली होती. त्यामुळे आता नव्या दराने साखर खरेदी होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.’ सध्या मध्यम ग्रेडच्या आणि छोट्या ग्रेडच्या साखरेच्या दरांतील फरक केवळ ५० रुपयांवर आला आहे. यापूर्वी हा डिफरन्स १०० ते २३० रुपयांच्या दरम्यान होता. सध्या एस शुगर ३१०० रुपये तर एम शुगर ३१५० रुपये क्विंटल दराने विकली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली. साखरेची मागणी ही पुढच्या महिन्यापासून वाढेल, असे मतही कुवेदिया यांनी व्यक्त केले आहे. सध्या साखर व्यापारी सरकारच्या घोषणांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार जास्त विक्री कोटा जाहीर करेल, अशी व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे, असे कुवेदिया यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत राज्यात ८२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. यापूर्वी यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज होता. पण, पाणी टंचाई आणि पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव यांमुळे आता राज्यातील साखर उत्पादन केवळ ९५ लाख टनापर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे.
उसाच्या थकीत बिलांचा ताजा आकडा अद्याप समजलेला नाही तरी, सध्याच्या घडीला राज्यात ६ हजार ५०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. सध्या २५ टक्केही एफआरपी जमा न केलेल्या साखर कारख्यान्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp