सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याच्या ४६व्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ नुकताच झाला. एकूण १६१ दिवसांच्या गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख ८८ हजार ४५५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. तर ७ लाख ७९ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले. कारखान्याने ५ कोटी ३६ लाख ३८ हजार युनिट वीज निर्मितीसह ६६ लाख ५७ हजार लिटर इथेनॉल व ७० लाख ८० हजार लिटर आरएस तयार केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. हंगाम सांगता प्रसंगी कारखान्याचे संचालक दामोधर टेमक व लक्ष्मण पांढरे यांनी सपत्नीक गव्हाण व उसाच्या मोळीची विधिवत पूजन करण्यात आले.
कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष कडू पाटील कर्डिले यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची शेवटची मोळी टाकून गळिताची सांगता करण्यात आली. सर्वाधिक ऊसतोडणी व वाहतूक करणाऱ्या हार्वेस्टर, ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडी मालकांचा अध्यक्ष नानासाहेब तुवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर, शेती अधिकारी विजय फाटके, मुख्य अभियंता एम. एम. ठोंबरे, मुख्य केमिस्ट हेमंत पांढरपट्टे, डिस्टिलरी व्यवस्थापक बाळासाहेब दरंदले, को. जन इनचार्ज ए. डी. वाबळे यांचा सत्कार करण्यात आला. संचालक भाऊसाहेब मोटे, बापूसाहेब शेटे, बबनराव दरंदले, बाबासाहेब भणगे, नारायणराव लोखंडे, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर, कडूबाळ गायकवाड, ताराबाई पंडित, सरव्यवस्थापक शंकरराव दरंदले आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष कर्डिले यांनी आभार मानले.