मुंबई : महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे साखर कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिपक्ष समितीची बैठक आज (15 जानेवारी) मुंबईत होणार आहे. साखर संघाच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणाऱ्या या बैठकीत साखर कामगारांना पगारवाढ व इतर मागण्यांबाबत चर्चा होईल. तसेच नवीन वेतनवाढ, थकीत पगार, किमान वेतन व इतर प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.
साखर कामगारांच्या वेतनवाढीसाठी स्थापन करण्यात आलेल्या या समितीमध्ये साखर कामगार संघटनेच्या वतीने प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, कार्याध्यक्ष राऊ पाटील, अविनाश आपटे, महासंघाचे अध्यक्ष पी. के. मुडे, सरचिटणीस आनंदराव वायकर, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, प्रतिनिधी मंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, उपाध्यक्ष राजेंद्र तावरे, युवराज रनवरे, डी. एम. निमसे, फेडरेशनचे अध्यक्ष अविनाश आदिक यांचा समावेश आहे.